सपा आगामी निवडणुकीत३५० जागी मिळवेल विजय, हस्तरेषातज्ञाने भाकीत केल्याचा अखिलेश यादव यांचा दावा

लखनऊ- २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला ३५० जागांवर विजय मिळेल, असे भाकीत मला हस्तरेषातज्ञाने सांगितले आहे. ते खरे झाले आणि पक्ष सत्तेवर आल्यास जातीवर आधारित जनगणना घेतली जाईल, असे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जाहीर केले आहे.


अखिलेश रविवारी पत्रकारांशी बाेलत हाेते. दिल्लीला विमानाने जात हाेताे. प्रवासादरम्यान एका व्यक्तीने माझा हात पाहिला. तुम्ही परिश्रम घेतल्यास ३५० जागी विजय मिळवत पुढचे सरकारचे तुमचेच असेल, असा दावा त्याने केला. आता मी ३५० पेक्षा जास्त जागी विजय मिळवण्याचा संकल्प केला आहे.


सत्ताधारी पक्षावर टीका करताना अखिलेश म्हणाले, थापा मारून एखाद्या पक्षाला ३०० जागा मिळत असल्यास प्रामाणिकपणे परिश्रम करून आम्हाला ३५१ जागा न मिळायला काय झाले? म्हणूनच आम्ही हे उद्दिष्ट साध्य करू शकताे, असे त्यांनी सांगितले. जातीवर आधारित जनगणना करण्याचे ते (भाजप) का टाळत आहेत? समाजातील अनेक समस्या त्यातून सुटण्यास मदत हाेईल, असे सांगून अखिलेश यांनी मुख्यमंत्री अादित्यनाथ यांच्यावर टीका केली. देशाची राज्यघटना याेगींना आवडत नाही. समाजातील मागासवर्गाला घटनेने अधिकार दिला आहे. भाजप घटनेवर हल्ला करत आहे, असा आराेपही अखिलेश यांनी केला. उत्तर प्रदेशात सत्तांतर झाल्यापासून सामान्य, मागास समुदायाची सातत्याने उपेक्षा झाली आहे. त्यामुळे आदित्यनाथ सरकारला सत्तेवरून दूर केले पाहिजे. समाजवादी पार्टीच्या काळात अनेक विकास कामे झाली आहेत. हे लक्षात घेऊन जनता आगामी निवडणुकीत पक्षाला कौल देईल, असा विश्वास अखिलेश यांनी यापूर्वीही अनेकवेळा व्यक्त केला.


बिहार निवडणुकीत उतरणार नाही


सपा प्रमुख म्हणाले, आमचा पक्ष आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत उतरणार नाही किंवा काेणत्याही उमेदवारास पाठिंबा दिला जाणार नाही. मात्र विजय हाेऊ शकणाऱ्या उमेदवारांचे समर्थन केले जाईल. पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबतचा निर्णय उपाध्यक्ष किरणमाॅय नंदा घेतील. यानिमित्ताने बसपाचे माजी खासदार बलीहारी बाबू, माजी मंत्री तिलकचंद अहिरवार, माजी आमदार फेरान लाल अहिरवार यांनी सपामध्ये प्रवेश केला.